औरंगाबाद : शिवसेनेच्या वतीने शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पीक विमा मदत केंद्रास भेट व शेतकर्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पा. डोणगावकर यांनी केलेल्या पोस्टरबाजीमुळे दिसत होता. त्यामुळे उद्धव ठाकरे जरी शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी आले असले तरी स्थानिक पदाधिकार्यांत मात्र विसंवाद असल्याची चर्चा होती.
शिवसेनेच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण मतदारांशी संपर्क वाढावा यासाठी शिवसेनेच्या वतीने अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या दौर्याचे आयोजन गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे पीक विमा मदत केंद्रास भेट आणि शेतकर्यांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंबादास दानवे हे सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. २०१४ मध्ये त्यांनी गंगापूर-खुलताबाद मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुखांचा दौरा आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाचे संयोजक नेमके कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील छावणी उड्डाण पुलाकडून गंगापूरला जाणार्या रस्त्यावर या कार्यक्रमाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. जिल्हाप्रमुख यांनी काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या दौर्याच्या स्वागताचे पोस्टर्स लावले होते. त्यावर त्यांनी संयोजक म्हणून स्वतःचे नाव टाकले होते. तर मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या होर्डिंग्जवर जि.प.च्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी पोस्टर्स लावले. त्यावर त्यांनी स्वतःचे संयोजक म्हणून नाव टाकले होते. एकाच कार्यक्रमाचे दोन संयोजक असल्याचे पाहून खरा संयोजक कोण असा प्रश्न येणार्या जाणार्;या नागरिकांना पडला आहे.
प्रथमच खैरे आयोजनापासून दूर?
शिवसेनेच्या स्थापनेपासून ते मागच्या महिन्यात संपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना प्रमुखाचा जिल्ह्यातील कोणत्याही कार्यक्रमाचे संयोजक व निमंत्रक माजी खा. चंद्रकांत खैरे हेच असायचे आणि ते आयोजनही करायचे. लोकसभेत खैरे पडले. त्यानंतर प्रथमच शहराबाहेर झालेल्या पक्षप्रमुखांच्या कार्यक्रमाचे आयोजक खैरे नव्हते, अशी चर्चा कार्यक्रम स्थळी होती. पूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वेसर्वा खैरेच होते.










